फार्मसी क्षेत्रात आहेत करिअरच्या अनेक संधी !! – डॉ. मनोजकुमार एम नितळीकर

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. चांगले करिअर घडवण्यासाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांच्या दृष्टीने कोणता अभ्यासक्रम चांगला आहे किंवा त्यांना काय करायचं आहे, याबाबत विद्यार्थी अनेकदा द्विधा मन:स्थितीत असतात. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना काय करावे हेच कळत नाही.

12 वी नंतर उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि करिअरच्या दृष्टीने कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेले असेलच. करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बारावीच्या परीक्षा झाल्या असून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षांचे वेध लागले आहेत.

बारावीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी औषध निर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. कोरोनाच्या काळात नवसंजीवनी मिळालेल्या औषध निर्माणशास्त्र अर्थात फार्मसीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक आणि निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांना फार्मसी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्या आहेत.

फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नॅनो टेक्नॉलॉजी, कॅन्सर ड्रग्ज आणि विविध क्षेत्रात संशोधनासाठी जातात. याचबरोबर डेटा सायन्स, क्लिनिकल रायटिंग आणि विविध क्षेत्रात मोठ्या संधी आहेतच; शिवाय परदेशात ‘फार्मसी इकॉनॉमिक्स’ या क्षेत्रातील संधीही खूप मोठ्या आहेत. यामुळे सध्या या क्षेत्रात सुरुवातीला दिले जाणारे वेतनही चांगले मिळते.

मात्र हे फार्मसी क्षेत्र नक्की आहे तरी काय? आणि या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कशा मिळतील? यासाठी या क्षेत्रात नक्की कसं शिक्षण घ्यावं? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठीची पात्रता:
विज्ञान शाखेतून बारावीला पीसीएमबी म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी परीक्षा देऊन अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

बारावीनंतर डी फार्मसी किंवा बी फार्मसीला प्रवेश मिळू शकतो.

डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharmacy):
हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. स्टेट फार्मसी काउन्सिल कडे फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केल्यावर मेडिकल स्टोअर, वितरक आणि घाऊक विक्रेत्यांना औषधे वितरीत करता येतात. फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केल्यानंतर सरकारी रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध होते. औषधांच्या विक्री प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात किंवा स्वतःची फार्मसी म्हणजेच मेडिकल स्टोअर सुरू करू शकतात.

क्लिनिकल रिसर्च असिस्टंट, शासकीय दवाखान्यात फार्मासिस्ट, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, औषधे बनवण्याच्या कंपनीत विविध विभागामध्ये उत्तम संधी असतात. क्वालिटी अॅश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल, फॉर्मुलेशन डेव्हलपमेंट, पॅकेजिंग इ. क्षेत्रात करिअर घडवता येते.

बॅचलर ऑफ फार्मसी (B. Pharmacy):
हा 12वी नंतर 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये फार्मसीशी संबंधित प्रत्येक माहिती दिली जाते जसे की औषधे बनवणे, त्यांची चाचणी करणे इ. हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांना वैद्यकशास्त्रात रस आहे किंवा बायोकेमिकल क्षेत्रात करिअर करायचे आहे.

हा 4 वर्षांचा कोर्स पूर्ण करून फार्मसीमध्ये चांगले भविष्य निर्माण केले जाऊ शकते. यामध्ये औषधांचा अभ्यास केला जातो आणि औषधे तयार करण्याचे तंत्र शिकवले जाते. याशिवाय आपण फार्मास्युटिकल उद्योग, हर्बल उद्योग, सौंदर्यप्रसाधन उद्योग किंवा क्लिनिकल संशोधन क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता.

डॉ. मनोजकुमार एम नितळीकर
सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख
कासेगाव शिक्षण संस्थेचे राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगांव

Written by